अमरनाथ यात्रेच्या बसला गांदरबलमध्ये अपघात, 39 यात्रेकरू जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात मंगळवारी सकाळी अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. कांगन परिसरातील गनीवान (हरिगनवन) येथे तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून घसरून एका घरावर आदळली. या अपघातात किमान 39 यात्रेकरू जखमी झाले असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस सिंध नदीत कोसळण्याची शक्यता होती. मात्र, ती आधीच एका घरावर आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. या धडकेत घराचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.

 

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जखमी यात्रेकरूंना स्थानिक नागरिक, सुरक्षा दल आणि बचाव पथकाच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात आणि काहींना श्रीनगरमधील एसकेआयएमएस (SKIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बहुतांश यात्रेकरूंना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी अपघाताची माहिती मिळताच गांदरबलचे उपायुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमी यात्रेकरूंच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांनी सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. राज्यपालांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, ” दर्शन घेऊन परतणारे 39 यात्रेकरू या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर एसकेआयएमएसमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळेल, याची प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे.”

 

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, प्राथमिक माहितीनुसार तीव्र वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.