
माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच दिलेल्या राजीनाम्यानंतर, भाजपच्या खासदारांनी संसद परिसरामध्ये त्यांचे स्वागत केले. त्यावर बोलताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचे संसद परिसरात एखाद्या ‘सुपरस्टार’सारखे स्वागत झाले. भाजपचे हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर संसद परिसरात भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना पारंपरिक टोपी आणि उपरणे घालून ‘प्रधान जिंदाबाद’च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. दुसरीकडे, विरोधी पक्षाच्या खासदारांनी यावर जोरदार आक्षेप घेत “चोर, चोर, पेपर चोर” अशा घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवला.
“मोदी सरकारवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही” – प्रियंका गांधी
“हे लाजीरवाणे नाही का? धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या परिस्थितीत राजीनामा दिला हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. तरीही काल संसद परिसरात त्यांचे अशा प्रकारे स्वागत करण्यात आले, जणू ते कोणी सुपरस्टारच आहेत. मोदी सरकारवर आज कोणीही विश्वास ठेवू शकत नाही, कारण अजूनही विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. सरकारला चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवायचा आहे की विद्यार्थ्यांना अजून दाबायचे आहे? हे पूर्णपणे चुकीचे आहे.”



























































