
कोकणात पावसाने जोर धरताच निसर्गाने पुन्हा एकदा आपली समृद्धी खुलवली असून चिपळूण तालुक्यातील माळराने, डोंगरकपारी आणि जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानअळंबीची मोठ्या प्रमाणात आवक बाजारात सुरू झाली आहे. शहरातील चिंचनाका, बाजारपेठ परिसर, बहादूरशेख नाका आणि खेर्डी परिसरात अळंबी विक्रीसाठी दाखल झाली आहेत. पावसाळ्यात मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध होणाऱ्या या दुर्मीळ रानभाजीला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सध्या बाजारात अळंबीला प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपयांचा भाव मिळत आहे.
चिपळूण तालुक्यातील विशेषकरून कळकवणे गावातील आदिवासी बांधव पहाटेच जंगल, रानमळे, डोंगरकपारी आणि झाडाझुडपांच्या परिसरातून नैसर्गिकरित्या उगवलेली अळंबी गोळा करून बाजापेठेत विक्रीसाठी आणत आहेत. खेर्डी, छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका), मार्कंडी तसेच बसस्थानक परिसरात अळंबीच्या विक्रीचे स्टॉल ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. पावसाळ्यातच उपलब्ध होणारी ही रानभाजी चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
अळंबीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ती शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. त्यामुळे अनेकजण आवर्जून अळंबीची भाजी, मसाला फ्राय, रस्सा आणि इतर पारंपरिक पदार्थ बनविण्यासाठी तिची खरेदी करीत आहेत. विशेष म्हणजे, रानअळंबीच्या विक्रीमुळे कळकवणे परिसरातील आदिवासी बांधवांना चांगला आर्थिक आधार मिळत आहे.
पावसाळ्यातील काही आठवड्यांच्या या हंगामात जंगलातून मिळणाऱ्या नैसर्गिक संपत्तीमुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडत असून, ही विक्री त्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रानअळंबीची चव चाखण्यासाठी आणि पौष्टिक आहाराचा लाभ घेण्यासाठी शहरवासीय बाजारात गर्दी करीत आहेत. निसर्गाची ही अनमोल देणगी आणि ग्रामीण भागातील कष्टकरी हातांची मेहनत यामुळे चिपळूणच्या बाजारपेठेत सध्या रानअळंबीची विक्री होत आहे.




























































