
वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजींवर ताव मारत तुम्ही माळशेज घाटातील पावसाळी सफरीचा आनंद लुटण्यासाठी येणार असाल तर जरा सावधान… कारण मुरबाडच्या खड्डेमय प्रवासात चंद्रावरील सफरीची अनुभूती मिळेल. मुरबाड-माळशेज मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या हजारो खड्यांमुळे प्रवाशांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. चंद्रावरील खड्यांप्रमाणे माळरं माळशेज घाटातही खड्यांचे दर्शन पर्यटक, प्रवाशांना होत आहे. विशेष म्हणजे ‘साहसी’ ठेकेदारांनी चक्क पेव्हर ब्लॉकचे तुकडे आणि माती लोटून हे खड्डे बुजवण्याची अनोखी ‘किमया’ केली आहे. ठेकेदारांचा ‘प्रयोग’ देखील फसला असून झाकलेले खड्डे उघडे पडले आहेत. खड्डे व्यवस्थित बुजवेपर्यंत मुरबाडमधील प्रवाशांची चंद्रसफर अशीच सुरू राहणार आहे.
मुरबाड-माळशेज प्रवास नको रे बाबाऽऽ असे म्हणण्याची वेळ वाहनचालक व प्रवाशांवर आली आहे. जून महिन्यात लाखो रुपये खर्चुन मुरबाडच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. पण या कामातही ठेकेदारांनी गोलमाल केल्याचे दिसून आले आहे. नढई, खाटेघर, सरळगाव, खुटल, आंबेळे, शिळघर, उमरोली, टोकावडे येथे ठिकठिकाणी खड्डे पडले होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठेकेदाराने कायमस्वरुपी तोडगा काढण्याऐवजी या खड्यांमध्ये पेव्हर ब्लॉकचे तुकडे आणि त्यावर माती टाकली. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात हा तकलादू भराव वाहून गेला आणि पुन्हा भलेमोठे चंद्राप्रमाणे खड़े दिसु लागले.
ठेकेदाराच्या या ‘हात की सफाई मुळे लाखो रुपये पाण्यात गेले असून मुरबाड-माळशेज मार्गाची वाट लागली आहे. त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुरबाडवासीयांनी केली आहे.
खड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनाजी हिल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजब उत्तर दिले. ते खड्डे कोण ठेकेदार बुजवत आहे याची आपणास माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षक कठडे कोसळले
मुरबाड-माळशेज महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो. मात्र या मार्गावरील धानिवली पुलाला भेगा पडल्या असून संरक्षक कठडेदेखील कोसळू लागले आहेत. वैशाखरेपासून सावर्णों गावापर्यंत आठ किमीच्या मार्गावर सात ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे माळशेज घाटातील प्रवास दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनू लागला आहे.
अपघातांना निमंत्रण
मुरबाडमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या असंख्य खड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आतापर्यंत घाटात अनेक अपघात झाले असून प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
तर शिवसेना आंदोलन करणार
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुरबाड-माळशेज महामार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असून त्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदाराची बिले मंजूर करू नयेत अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख संतोष विशे यांनी दिला आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनीही ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.





























































