
जंतरमंतरवर चाललेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये लाठीचार्जची जबाबदारी कोण घेणार असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारला धारेवर धरलं. दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, लाठीचार्ज करण्याची जबाबदारी कोण घेणार हा आदेश कोणी दिला? यासंदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. बाकी सगळ्या गोष्टीवर निवेदनं करतात. 370 कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची जबाबदारी घेणारेत. पक्ष फोडण्याची जबाबदारी घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतरमंतरवर केलेल्या लाठीचार्जची जबाबदारी कुणी घ्यावी यासंदर्भात गृहमंत्र्यांचे निवेदन घ्यायला पाहिजे. झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. या फार सोप्या मागण्या आहेत अहंकार कसला आहे तुम्हाला असे म्हणत संजय राऊतांनी केंद्रसरकारवर शरसंधान साधले.
धर्मेंद्र प्रधान यांचे संसदेत आल्यानंतर स्वागत करण्यात आले या प्रश्नावर राऊत म्हणाले, धर्मेंद्र प्रधान हुतात्मे आहेत का? त्यांनी काय बलिदान दिलंय का. मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला. भ्रष्टाचार झाला म्हणून नीट परीक्षेत घोटाळा झाला म्हणून मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला. पण भ्रष्टाचाराचे अवडंबर माजवणे हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातील भ्रष्टाचारी असोत किंवा आपल्या पक्षातले बलात्कारी असोत. त्या सगळ्यांना पालखीत बसवुन त्यांची संतांसारखी मिरवणूक काढायची ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये त्यांना आता नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले. आता काही दिवस त्यांच्या टाळ चिपळ्या वाजवतील.



























































