
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाची चीड आणणारी घडली. गावात स्मशानभूमीची सुविधा नसल्याने 81 वर्षीय वृद्धावर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मदनापूर येथील रामदास पुरुषोत्तम मानकर (वय 81) यांचे निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी अधिकृत स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांचे पुत्र विजय मानकर यांनी संतप्त होत वडिलांवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे आवारच अंत्यसंस्काराचे ठिकाण बनले.
या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मदनापूरसह परिसरातील सुमारे 30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही. अनेक वर्षांपासून निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही शासन आणि प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात केली. परिणामी, नागरिकांना आपल्या नातेवाइकांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचाही अधिकार मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“शासन विकासाच्या घोषणा करते, पण माणसाच्या शेवटच्या प्रवासासाठीही जागा देऊ शकत नाही. ही ग्रामीण भागातील नागरिकांची शोकांतिका असून, राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावर मोठे प्रश्नचिन्ह आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान, मारेगाव तालुक्यातील सुमारे 30 गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर असल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. शिवसेना आमदार संजय दरेकर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून शासनाकडे स्मशानभूमीसाठी जागा व निधीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांवर ग्रामपंचायत कार्यालयात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर तरी राज्य सरकार आणि संबंधित प्रशासन जागे होणार का, की ग्रामीण भागातील नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी आणि मृत्यूनंतर सन्मानाने निरोप मिळवण्यासाठीही संघर्षच करावा लागणार, असा संतप्त सवाल आता परिसरातून उपस्थित होत आहे.




























































