
सोनेचांदीतील तेजीला मंगळवारी अचनाक ब्रेक लागला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सोनेचांदीत चांगली तेजी दिसत होती. मात्र, मंगळवारी दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. वायदे बाजारात (मल्टी कमोडिटी एक्सचेंज, MCX) मंगळवारी व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती झपाट्याने कोसळल्या. चांदीची किंमत एकाच झटक्यात प्रति किलोग्राम ४,५०० पेक्षा जास्त घसरली. तर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३०० पेक्षा जास्त घसरली.
दीर्घकाळच्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात चांदीच्या वायदे दरांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली होती. ती सोमवारपर्यंत सुरू राहिली. मात्र, मंगळवारी MCX वर व्यवहार सुरू होताच चांदीच्या दरात घसरण झाली. ४ सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या चांदीचा भाव सोमवारी बाजार बंद होताना प्रति किलोग्राम २,२१,१७३ वर बंद झाला आणि आता तो घसरून २,१६,५९२ वर आला. त्यामुळे सोने ४,५८१ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
मंगळवारी चांदीच्या वायदे दरात झालेल्या घसरणीमुळे, या मौल्यवान धातूची किंमत पुन्हा एकदा त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून २ लाख रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात १ किलो चांदीच्या किमतीने ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून ४,२०,०४८ रुपयांचा उच्चांक गाठला होता, आता त्यात २,०३,४५६ रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीसोबतच सोन्याच्या वायदे बाजारात दरात मोठी घसरण झाली. ५ ऑगस्ट रोजी मुदत संपणारे सोने सोमवारी प्रति १० ग्रॅम १,४३,०६३ रुपयांवर बंद झाले आणि मंगळवारी १,४१,७५९ रुपयांवर आले. त्यामुळे १० ग्रॅम २४-कॅरेट सोन्याचा दर १,३०४ रुपयांनी घसरला आहे.
चांदीप्रमाणेच, सोन्यानेही यावर्षी २९ जानेवारी रोजी वायदे बाजारात (फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये) प्रथमच २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता, आणि आता, १० ग्रॅम २४-कॅरेट सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकी पातळीपेक्षा ५०,००० रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहे.



























































