
पेपरफुटी विरोधी विधेयकावर लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शांततेत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गन का चालवली, ते काय दहशतवादी होते का, असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकारच्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला. कोणाच्याही वेदनांची थट्टा उडवू नये, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला. देशाच्या तरुणांवर पेलेट गन आणि एके-४७ चा वापर करण्याची काय गरज होती आणि हे आदेश नेमके कोणी दिले, पंतप्रधान की गृहमंत्र्यांनी, याचे उत्तर केवळ काँग्रेस पक्षच नाही तर संपूर्ण देश मागत आहे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सध्याची व्यवस्था विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत असून पेपरफुटी प्रकरणी कारवाईची मागणी करणे गैर आहे का, असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला. मुले शांततेने निदर्शने करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. देशातील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लोकांना भरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशाचा शिक्षण अर्थसंकल्प १.४ लाख कोटी रुपये असताना, दुसरीकडे नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून १.३२ लाख कोटी रुपये घेतले जात असल्याचे त्यांनी संसदेत मांडले. इतके सर्व होऊनही केवळ पीआर आणि इतर गोष्टींच्या आधारे आपली नैया पार होईल, असा समज पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचे त्या म्हणाल्या.
एकीकडे महाराष्ट्रातील एक कुटुंब आपल्या मुलीच्या मृत्यूचे दुःख करत असताना, दुसरीकडे आदल्या दिवशी माजी शिक्षणमंत्र्यांचे संसदेत स्वागत केले जात होते, यावरही प्रियंका गांधी यांनी कडाडून टीका केली. ज्या ठिकाणी डोळ्यांत लाज असायला हवी, तिथे सन्मान केला जात आहे, हा कोणता अहंकार आहे आणि कसला अभिमान बाळगला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले.



























































