RSS ला राष्ट्रध्वज आणि संविधानाचा आदर नाही – प्रियांक खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधताना कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी मंगळवारी मोठा आरोप केला. “स्वातंत्र्यानंतर तब्बल ५२ वर्षे आरएसएसने त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही आणि त्यांनी राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा कधीही सन्मान केला नाही,” असे ते म्हणाले. नवी दिल्लीत आयोजित आरएसएसची जनगणना का आवश्यक आहे? या विषयावरील परिषदेत बोलताना प्रियांक खरगे यांनी संघाच्या इतिहासावर आणि विचारधारेवर सडकून टीका केली. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

१९२९ मध्ये जेव्हा संपूर्ण हिंदुस्थानने २६ जानेवारी १९३० रोजी तिरंगा फडकवण्याचा एकमुखाने निर्णय घेतला होता, तेव्हा केवळ आरएसएसने याला विरोध केल्याचे खरगे यांनी म्हटले.ते म्हणाले की, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी २६ जानेवारी रोजी तिरंगा न फडकवण्याचा आदेश दिला होता आणि त्याऐवजी २१ जानेवारी रोजी सर्व शाखांवर भगवा ध्वज फडकवण्यास सांगितले होते. खरगे यांनी असाही आरोप केला की, आरएसएसने केवळ तिरंग्यालाच नाही तर देशाच्या संविधानालाही नाकारले होते आणि हिंदुस्थानची राज्यघटना म्हणून मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते. जे लोक राष्ट्रध्वज आणि संविधानाचा आदर करत नाहीत, ते इतरांचा सन्मान कसा करतील, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वातंत्र्योत्तर भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना खरगे यांनी संघाच्या मुखपत्राचा संदर्भ दिला. १४ ऑगस्ट १९४७ रोजी संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रात छापून आलेल्या लेखानुसार, तिरंग्याचा कधीही स्वीकार केला जाणार नाही आणि त्याचा देशावर वाईट मानसिक परिणाम होईल, असे म्हटले होते. यासोबतच संघाने स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी काळा दिवस पाळला होता, असा दावाही खरगे यांनी केला. याआधीही प्रियांक खरगे यांनी आरएसएसच्या कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी त्यांच्या अधिकृत नोंदणीची आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी केलेली आहे.