
दापोली-खेड मार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी (२८ जुलै) सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात नर्सिंगची विद्यार्थिनी सेजल पांडुरंग भागवत (वय २२, मूळ रा. टेटवली-खुटाचा कोंड, सध्या विद्यापीठ चाळ, दापोली) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत आयरे (मूळ रा. असोंड, सध्या विद्यापीठ चाळ, दापोली) ही जखमी झाली असून तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघी नर्सिंगच्या विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी दापोलीहून दुचाकीवरून खेडच्या दिशेने निघाल्या होत्या. सेजल दुचाकी चालवत होती, तर वैष्णवी मागे बसली होती. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकी घसरून दोघी रस्त्यालगत फेकल्या गेल्या. अपघातात सेजल रस्त्यालगतच्या नाल्यात पडली. नाल्यातील पाणी तिच्या नाका-तोंडात गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तर वैष्णवीला दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता दोन्ही युवतींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सेजल भागवत हिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सेजल आणि वैष्णवी या दोघींची नर्सिंगची परीक्षा सोमवारीच संपली होती. त्यानंतर त्या आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाल्या असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.



























































