पाकव्याप्त कश्मीरमधील निवडणुका हा बेकायदेशीर ताबा लपवण्याचा बनाव, हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये (PoK) आयोजित केलेल्या विधानसभा निवडणुकांवर हिंदुस्थाने कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या निवडणुकांना केवळ एक बनाव किंवा दिखावा म्हटले असून, यामागे आपला बेकायदेशीर ताबा लपवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी एका निवेदनात हिंदुस्थानची भूमिका मांडताना पाकिस्तानच्या बेकायदेशीर नियंत्रणाखालील क्षेत्रासह जम्मू-कश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सध्या पाकव्याप्त कश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर प्रतिक्रिया देताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया म्हणजे पाकिस्तानने रचलेला केवळ एक वरवरचा खेळ आहे. या माध्यमातून पाकिस्तान आपला बेकायदेशीर ताबा लपवण्याचा आणि त्या प्रदेशातील मानवाधिकार उल्लंघनाच्या गंभीर घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे.”

ते म्हणाले की, गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने म्हणजे पाकिस्तानकडून होत असलेले सातत्यपूर्ण आर्थिक शोषण, नागरिकांना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणे आणि प्रशासकीय दडपशाही यांचा थेट परिणाम असल्याचे हिंदुस्थानने ठणकावून सांगितले आहे.