NEET, TET नंतर MPSC चा पेपरही फुटला, पेपरफुटीचे रॅकेट कोणाच्या वरदहस्ताखाली सुरु? – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. नीट पेपरफुटीनंतर राज्यात टीईटीचा पेपर फुटला आणि आता MPSC च्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. भाजपा सरकारला एक परीक्षाही व्यवस्थित घेता येत नाही, पेपरफुटीने लाखो विद्यार्थी व पालकांच्या आशा आकांशावर बुलडोझर फिरवला जात असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला हा खेळ थांबला नाही तर भाजपाला महागात पडेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

भाजपा सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पेपरफुटीने पाणी फेरले आहे. सरकार व सरकारी यंत्रणा मात्र टोलवाटोलवी करत आहे. यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयाचे गांभिर्य राहिलेले नाही. पेपरफुटी, निकालातील घोटाळे, गुणांतील गैरव्यवहार आणि अधिकृत तक्रारींसह पुरावे समोर आले तरीही सरकार आणि यंत्रणा शांतच आहेत. टीईटी निकालातील गडबड समोर येऊनही सरकारी यंत्रणा ‘असे काही झालेच नाही’ असे म्हणत आहे. एमपीएससीकडूनही पेपरफुटीवर गोलमाल स्पष्टीकरण दिले जात आहे, हा तरुणांचा व पालकांवरचा अन्याय आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात आहे, हीच या भ्रष्ट, निष्क्रिय सरकारची कार्यपद्धती आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. पेपरफुटीचे रॅकेट कोणाच्या वरदहस्ताखाली चालू आहे? सरकार मधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने हे उद्योग सुरू आहेत? याची उत्तरे फडणवीस सरकारला द्यावी लागतील. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी कराल तर हीच तरुणाई तुम्हाला खूर्चीवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.