लेख – ‘शिकारी’च भक्ष्य होऊ लागले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

जंगलातील शिकारी असलेला वाघच आता शिकार होऊ लागल्याचे वाढते आकडे चिंताजनक आहेत. देशात व्याघ्र संख्येत वृद्धी होत असल्याची सकारात्मक बातमी असताना वाघांच्या मृत्यूच्या बातम्या नैराश्य उत्पन्न करणाऱ्या आहेत. जंगलात संरक्षित क्षेत्रात निर्भयपणाने मुक्त संचार करणारा वाघ बफर क्षेत्रात मात्र अनेक संकटाना बळी पडतो आहे. वनक्षेत्र कमी होणे, वनक्षेत्रात होणारे अतिक्रमण हा अनेक वर्षे न सोडवलेला प्रश्न आज वाघांच्या मृत्यूचा सापळा ठरतो आहे. आजच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त…

महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास या वर्षी जुलै महिन्यापर्यंत 24 वाघांचा मृत्यू झाला आहे. गत वर्षी महाराष्ट्रात 38 वाघ मृत्युमुखी पडले होते. या वर्षाचे अद्याप पाच महिने शिल्लक असताना पहिल्या साडे सहा महिन्यांतच वाघांच्या मृत्यूची संख्या 24 पर्यंत पोहोचली आहे. देशभरात गत वर्षी एकूण 166 वाघ मृत्युमुखी पडले होते जे 2024 सालच्या तुलनेत 40 अधिक होते. वर्षागणिक मृत्यूच्या संख्येत होत असलेली वाढ व्याघ्र संवर्धनासाठी एक आव्हान ठरू लागले आहे. मानव वन्यजीव संघर्ष, वाढते शहरीकरण, अतिक्रमण, अवैध विद्युत प्रवाह होणाऱ्या जीवितहानीसाठी निमित्त ठरते आहे.

वाघाचे पुनर्वसन हा उपक्रम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा लगतचा परिसर येथे व्याघ्र भ्रमण मार्गात मोठ्या प्रमाणात होणारे अडथळे वाघ आणि मानवाच्या जिवावर उठले आहेत. कधी खाण, रेल्वे मार्ग, तर कधी महामार्ग वन्यजीवांच्या मार्गात गतिरोधकाचे काम करताहेत. स्वतःचा मार्ग प्रशस्त करत असताना वन्य जीवांच्या मार्गातील उद्भवणारे अडथळे मानव व वन्य जीवातील पेटलेल्या संघर्षाला अधिक तीव्र होण्यास हातभार लागतो. वनक्षेत्रालगत वास्तव्यास असलेले वन्य जीव व मानव वस्ती त्याला बळी पडते. कधी वन्य जीव शिकारीच्या भूमिकेत तर कधी मानव शिकरीच्या भूमिकेत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र विदीर्ण करणारे आहे. उन्हाळ्यांत पेटणारे वणवे असो अथवा वनक्षेत्रात होणारी अवैध वृक्षतोड, प्रत्येक प्रत्यक्षात त्याचा दुष्परिणाम हा वन्य जीवांवर आणि अप्रत्यक्षात मानवावरच होतो आहे, पण धोरणकर्ते हे लक्षातच घ्यायला तयार नाहीत.

शास्त्रीय कारणे 

वाघ आणि वन्यजीवांच्या मृत्यूसाठी जशी मानवनिर्मित कारणे आहेत तशी शास्त्रीय कारणेसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे. वाघांच्या संख्येत प्रतीवर्षी सहा टक्के होणारी वाढ आणि तुलनेने प्रतीवर्षी कमी होत असलेले वनक्षेत्र ह्या असमतोलामुळे अनेक समस्या उभ्या झाल्या आहेत. एका वाघाला जगण्यासाठी 20 ते 100 चौ किमी वनक्षेत्र गरजेचे आहे. वाघांची वाढती संख्या आणि कमी होत चालेले वनक्षेत्र बघता वाघांचे आयुष्यसुद्धा कमी होऊ लागले आहे. स्वतःचे साम्राज्य आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या नैसर्गिक गरजेपायी वाघांची आपसातील लढाई एका वाघाची संख्या कमी करते. या व्यतिरिक्त प्रजाननासाठी जोडीदार शोधण्यास वाघाचा प्रवास मोठा असू शकतो. आपले भक्ष्य शोधण्यासाठी वाघाला अनेक मैल प्रवास करावा लागतो आहे. विद्यमान परिस्थितीत चितळ, हरीण, सांबर, नील गाई या वनक्षेत्रात कमी आणि शेतशिवारात मोठय़ा प्रमाणात दिसतात. हिंदुस्थानच्या वन क्षेत्रात इंग्रज काळात लावलेली Lantana (हिंदीत राइमुनिया. मराठीत घाणेरी) ही काटेरी रोपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. घाणेरी गवताळ प्रदेश कमी करण्यात भर घालणारी झुडपे असल्याने शाकाहारी वन्यजीव त्यांच्या शोधात वनक्षेत्र बाहेर फिरतात. घाणेरी रोप हे हिंस्त्र वन्यजीवाना लपण्यासाठी आदर्श असले तरी त्यांच्या भक्ष्यावर उपासमारीची वेळ आणते. साहजिकच भक्ष्य शोधण्यात वाघ, बिबट हे वनक्षेत्राबाहेर मागोवा घेत ओढले जातात. या परिस्थितीत गाव, शेतशिवार, मानवी वस्ती ही शाकाहारी व मांसाहारी वन्यजीवाना आकृष्ट करते. त्यातूनच वाघासारख्यो प्राणी मृत्यूच्या सापळय़ात सापडत आहेत. वाघांच्या नशिबाची अशी मांडलेली थट्टा उघड्या डोळ्यांनी बघण्याखेरीज दुसरा कुठलाच उपाय सध्या दृष्टिपथात नाही, ही व्याघ्र संवर्धनाची सर्वात मोठी शोकांकतिका म्हणावी लागेल.

एका अहवालनुसार 2006 ते 2018 दरम्यान 18 हजार चौ.किमी क्षेत्रातून वाघ नाहीसे झाले आहेत. जागातील सर्वाधिक व्याघ्र संख्या आपल्या देशात आहे. इंदिरा गांधींनी सुरू केलेली व्याघ्र संवर्धन मोहीम संख्येने प्रचंड यशस्वी ठरली. कधी काळी झाडे लावा ही घोषणा देण्यात आली, कालांतराने नेते फक्त छायाचित्र काढून घेण्यासाठी वृक्षारोपण करण्यात धन्यता मानत. वृक्ष लागवड मोहीम अपयशी ठरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर झाडे लावा या घोषणेला पुढे झाडे जगवा या दोन शब्दांनी संजीवनी दिली. आज वाघ वाचवा या घोषणेच्या पलीकडे जाऊन त्या समवेत वाघ जगवा ही घोषणा कालानुरूप सयुक्तिक ठरेल. नुसती वाघाची संख्या वाढून काही साध्य होणारे नाही, तर त्यासोबत वाघ जगतील यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वाघांची संख्या तर वाढली पाहिजेच, परंतु ते जगायलाही हवेत. तसे पोषक आणि सकारात्मक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होणे ही काळाची गरज आहे. वाघ हा एकटा प्राणी प्रचंड प्रमाणात व्याघ्र पर्यटनातून कोटय़वधी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून देतो आहे. वाघ वाढल्यावर त्याच्या सभोवतालचे वनक्षेत्रसुद्धा वाढवणे अत्यावश्यक आहे. वाघांनी संवर्धन केलेले वनक्षेत्र खाणींना देणे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा ही वृत्ती झाली. ती वेळीच रोखणे गरजेचे आहे.