
आंदोलक विद्यार्थ्यांवरील ‘एफआयआर’ मागे घेण्याचे आश्वासन न पाळता विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. सोशल मीडियावरील रिल्स काढून टाकण्यासाठी नोटिसा बजावल्या जात आहेत. विद्यार्थ्यांवरील गुन्हे आणि नोटिसा मागे घ्या, त्यांना त्रास दिलात तर सोडणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.
आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 22 आणि 23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर एफआयआर झाले. अनेकांना डांबून ठेवले गेले. त्यात काही अल्पवयीन विद्यार्थीही आहेत. चेंबूर, आरसीएफ, भोईवाडा, वरळी येथील पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल केले गेले. विद्यार्थ्यांनी त्यांना आलेल्या नोटीसा shivesnauedtblegaled@gmedailed यावर पाठवाव्यात. शब्द दिल्याप्रमाणे शिवसेना त्यांचे खटले विनामूल्य लढेल.
सरकारला विद्यार्थ्यांपेक्षा रमेश म्हात्रेची काळजी
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सरकारने रॅपिड अक्शन फोर्स आणि पोलिसांच्या माध्यमांतून पेलेट गन्स, एके 47 , इलेक्ट्रीक शॉक, खिळे लागलेल्या लाठय़ा वापरल्या. सरकारला तरुणांच्या भविष्याची काळजी नाही, उलट कल्याण-डोंबिवलीमध्ये डॉक्टरांवर हल्ला करणाऱया नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन कसा मिळेल, यासाठी सरकार जास्त उत्सुक आहे, असला टोलाही त्यांनी लगावला. सीईटी पेपर घोटाळ्यामुळेच भाजपवाल्यांची मुले टॉपर येत असल्याचा गंभीर आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
लाठीमार कुणी केला
नागपूरमधील युवासेनेची कार्यकर्ता अपूर्वा हिला फरफटत नेले. शुद्धीवर आली तेव्हा आसपास सर्व पुरूष पोलीस होते. मुंबईतही एका महिलेच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. लाठीमार कुणी करायला लावला, दिल्लीतून आदेश आले की इथल्या गृहमंत्र्यांनी दिले, असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ज्या विद्यार्थ्यांनी एका हुकूमशहाला झुकवले त्यांचे अकाऊंट सरकार बंद करायला लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांचे करीअर बरबाद करायला निघालेत का, असा सवालही त्यांनी केले. दहशतवाद्यांविरुध्द एके-47 वापरली जाते, ती भाजपच्या जनरल डायरसारख्या ‘जनरल कायर’ सरकारने विद्यार्थ्यांवर वापरल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
गंभीर गुन्हे दाखल असलेले हजारो लोक दिल्लीतील आंदोलनात घुसले होते, असा सरकारचा दावा आहे. इतके सारे गुन्हेगार आंदोलनात पोहोचू शकत होते तर त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनाही धोका होता. हे खरं तर गृहमंत्री आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे फेल्युअर आहे. इतके सर्व गुन्हेगार बाहेर फिरताहेत तर त्यांना भाजपमध्ये घ्या, स्वच्छ होतील.
विद्यार्थ्यांच्या ‘रिल्स’मधील भाषा अश्लील होती असे सरकार म्हणते. इतरांना बदनाम करायला सोशल मीडियाचा वापर प्रथम भाजपनेच सुरू केला. आता तेच त्यांना चावायला लागले तर जास्त दुखते. कुणी खऱया गोष्टी बोलत असेल, व्यक्त होत असेल आणि भाजपच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देत असेल, तर त्यात वावगे काय?































































