
धारावी पुनर्विकास प्रकल्पासह शहरातील विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांच्या नावाखाली मुंबईतील हिरवाईची कत्तल केली जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये अडथळा ठरणारी तब्बल 2,710 झाडे तोडण्यास किंवा त्यांचे पुनर्रोपण करण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. प्रस्ताव येण्याआधीच धारावी प्रकल्पातील अर्धी झाडे कापून टाकली, असा धक्कादायक आरोप शिवसेनेने केला.
शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि नगरसेविका हर्षला मोरे यांनी प्रस्ताव येण्याआधी झाडे कापता, मग समितीसमोर प्रस्ताव आणता कशाला? असा थेट सवाल केला. प्रकल्पांच्या नावाखाली हजारोंच्या संख्येने झाडे कापता, पण ती लावता मुंबईच्या बाहेर! त्याचा आपल्याला काय फायदा, असा जाब प्रशासनाला विचारला.
‘जी झाडे तोडण्यात येणार आहेत, ती वाचवता येतील का, तसेच पालघरला जिथे झाडे लावण्यात येणार आहेत, त्या जागेची स्थळ पाहणी करण्यात यावी, ’ अशी मागणी हर्षला मोरे यांनी केली. नगरसेवक प्रमोद सावंत यांनी 20 वर्षांपूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी 2 टर्मिनससाठी तोडलेल्या 4 हजार झाडांची आजची स्थिती काय आहे, याचा पाहणी अहवाल सादर करण्याची मागणी केली.
या निर्णयात सर्वात चिंतेची बाब म्हणजे, परवानगी देण्यात आलेल्या झाडांपैकी 25 झाडांची ‘हेरिटेज ट्री’ म्हणून नोंद आहे, जी 50 ते 85 वर्षे जुनी आहेत. त्यापैकी 24 वारसा वृक्ष थेट तोडण्यास प्राधिकरणाने सहमती दर्शवली आहे, तर केवळ एका वारसा वृक्षाचे पुनर्रोपण केले जाणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे आगामी काळात सुमारे 8 हजार झाडांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजात अधिक व्यापकता आणण्यासाठी वृक्षतज्ञांसोबतच एक युवक आणि एका महिलेचा विशेष सदस्य म्हणून समितीत समावेश करण्याच्या प्रस्तावालाही प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.





























































