
भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये (बीएआरसी) विविध पदांसाठी होणाऱ्या नोकरभरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
खासदार शिवसेना नेते अनिल देसाई यांनी देशातील अग्रगण्य अणुऊर्जा विभागाचे सचिव व अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजितकुमार मोहंती यांची भेट घेतली. या बैठकीत संस्थेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, स्थानिक व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या रोजगाराबाबत तसेच कंत्राटी कामगारांचे मूलभूत प्रश्न या विषयांवर चर्चा झाली. यावेळी बीएआरसीच्या नोकरभरतीत स्थानिकांची संख्या फारच कमी असल्याने हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज असल्याकडे अनिल देसाई यांनी लक्ष वेधले.
या बैठकीत अपर सचिव निधी पांडे, अणुऊर्जा विभागाचे संचालक (संशोधन आणि विकास) नितीन जावळे, उपसचिव माधव दास तसेच स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.





























































