इराकमधील इराणसमर्थित संघटनांच्या ठिकाणांवर अमेरिका आणि सौदीच्या सैन्याचे संयुक्त हल्ले; अमेरिकन सैन्याची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
us-saudi-joint-airstrikes-target-pro-iranian-militias-in-iraq-centcom-statement

अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या लष्कराने इराकमधील इराणसमर्थक सशस्त्र गटांकडून वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ठिकाणांचा वापर गेल्या काही दिवसांत हल्ले करण्यासाठी करण्यात आला होता, अशी माहिती अमेरिकन लष्कराने मंगळवारी दिली.

‘गेल्या ७२ तासांत आयआरजीसीच्या (इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) निर्देशानुसार करण्यात आलेल्या ३० हून अधिक ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना अमेरिकन आणि सौदी लढाऊ विमानांनी पूर्व इराकमधील दहशतवादी गटांच्या रसद आणि शस्त्रसाठ्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले’, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) एका निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्यांच्याशी संबंधित दहशतवादी गटांनी हे हल्ले तात्काळ थांबवावेत, अन्यथा अमेरिकेकडून आणखी लष्करी कारवाई केली जाईल.’

सौदी अरेबियाने यापूर्वी मंगळवारी सांगितले होते की, इराकमधील इराणसमर्थक सशस्त्र गटांनी देशाच्या पूर्वेकडील भागातील पेट्रोलियम प्रकल्पांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने डागलेले ड्रोन त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पाडले. सोमवारीही अशाच प्रकारच्या हल्ल्याचा आरोप सौदी अरेबियाने केल्यानंतर इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले.