
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना त्रास होता नये, असे विधान पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील चिंचोली येथे वीज उपकेंद्राच्या उद्घाटनावेळी बोलताना केले. महायुती सरकारच्या या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.
वीज गेल्यास एकवेळ शेतकऱ्याला त्रास झाला तर तो सहन करेल, पण उद्योजकाला फार त्रास होऊ नये. लाईट गेली, उद्योगाचे नुकसान झाले तर मी तुला पैसे देणार नाही, असे त्याला कामगार किंवा मजुराला सांगता येत नाही. उद्योजकाला मजुराला पैसे द्यावेच लागतात, असे सांगत गुलाबराव पाटील यांनी उद्योजकांची तळी उचलली.
वीज नसल्याने नुकसान झाले आणि उद्योग बंद झाला तर दुसरा नवीन येणारा उद्योजक म्हणतो, जाऊ द्या साला येथे लाईटच नाही तर कशाला उद्योग टाकायचा? त्यामुळेच माझी हात जोडून विनंती आहे. आमच्या उद्योजकांना त्रास देऊ नका, असे गुलाबराव पाटील पुढे म्हणाले.
शेतकरीच तुमचा कार्यक्रम करून टाकतील : राजू शेट्टी
शिंदे गटाच्या मंत्र्याच्या या विधानावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. विजेचे वाटप सगळ्यांना झाल्यानंतर उरली तर शेतकऱ्यांना दिली जाते. ती वीज कमी दाबाची असते. असे असताना सरकारमधील मंत्र्यांचा जर का अशा प्रकारचा आविर्भाव असेल तर शेतीकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन कसा आहे हे स्पष्ट होते. अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला गृहित धरायला लागला तर गुलाबराव लक्षात ठेवा, शेतकरीच तुमचा पुढचा कार्यक्रम करून टाकतील, असा इशारा स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला. हा शेतकऱ्यांचा अपमान विजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तर चालेल, मात्र उद्योजकांना व्हायला नको, अशी जर एका मंत्र्याची भूमिका असेल तर त्यातून असंवेदनशीलता दिसते. शेतकऱ्यांना काही देत नसाल तर शेतकऱ्यांचा असा अपमान तरी करू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या.






























































