
>> प्रभाकर पवार, [email protected]
छत्रपती संभाजीनगरचा, महाराष्ट्राचा ३० वर्षीय सुपुत्र अभिजीत दीपके हा अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीतून Public Relations मध्ये मास्टर्स करीत होता. ३ मे २०२६ रोजी नीट यूजी परीक्षेचे पेपर लीक झाले. पेपर लीकच्या आरोपामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. २०२४ सालीही नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्या वेळीही धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. याचदरम्यान एका सुनावणीच्या वेळी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांचा ‘झुरळ’ असा उल्लेख केला, परंतु त्या वक्तव्याचा त्यांनी इन्कार केला. हा धागा पकडून अत्यंत अस्वस्थ झालेल्या अभिजीत दीपके याने अमेरिकेतूनच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना केली. त्याला लाखो तरुणांनी प्रतिसाद दिला. अभिजीतने बोस्टन सोडले व तो भारतात परतला (६ जून रोजी). त्यानंतर भारतात जे काही घडले ते साऱ्या जगाने पाहिले. अभिजीत दीपके हा एक डिसायडिंग फॅक्टर ठरला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत व त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन २५ जुलै रोजी यशस्वी ठरले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यासाठी काही आंदोलकांना आपले डोके, हातपाय आदी अवयव गमवावे लागले. महिलांची थोबाडे फोडण्यात आली. त्यांच्या पार्श्वभागावर काठ्या मारण्यात आल्या.
जालियनवाला बागेतील जनरल डायरच्या अत्याचारांची आठवण व्हावी इतक्या निर्दयपणे पोलिसांनी आंदोलक पळून जावेत म्हणून ‘जंतर मंतर’वर पॅलेट गन, अश्रुधूर, पाण्याचा फवारा, खिळ्यांच्या लाठ्या आदी आयुधांचा वापर केला. बिहारमध्ये तर एके ४७ रायफलमधून गोळ्या झाडण्यात आल्या. हे पाहून वर्दीत असलेला झारखंडचा एक पोलीस शिपाई शेरसिंग प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला, “आमच्या सहकाऱ्यांचा अल्पवयीन मुलांवर व महिलांवर सुरू असलेला अत्याचार पाहून माझ्या धमन्या तापल्या, रक्त उसळले। एके ४७ रायफल हातात घेऊन अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर त्या चालवाव्यात असे मला क्षणभर वाटले होते, परंतु मी संयम राखला. मी विद्यार्थी व महिलांवरील ‘जंतर मंतर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस दलाला रामराम ठोकत आहे.” असे बोलत शेरसिंगने राजीनामा दिला. या शिपायाच्या राजीनाम्यानंतर आणखी एका पोलीस निरीक्षकाने आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
मुंबई क्राईम ब्रँचमध्ये एकेकाळी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे शिरीष इनामदार म्हणतात, “जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला जातो, जखमी किंवा अद्दल घडविण्यासाठी नाही.” आंदोलन चिरडून टाका, असा स्पष्ट आदेश असल्याशिवाय इतकी स्ट्रॉग अॅक्शन कोणताही पोलीस घेणार नाही. आंदोलकांवर आदेश देणाऱ्यांनी हिंस्र जनावरे सोडली होती. इनामदार बोलतात ते खरे आहे. लहान मुलांवर, महिलांवर जीवघेणा हल्ला करणारे, दयामाया नसलेले पोलीस नव्हते, ते जंगली लांडगे होते, तरस होते. त्यात पोलीस वर्दी नसलेल्या साध्या वेषातील गुंडांची पशुता पाहून तर बघणाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. नीट परीक्षा घोटाळ्यामुळे २०-२२ मुलामुलीनी आत्महत्या केल्या. लाखो तरुण-तरुणींचे डॉक्टर होण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. पुढील पिढीवर अशी वेळ येऊ नये. कॉक्रोच जनता पार्टीच संस्थापक अभिजीत दीपके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन पुकारले. ते चिरडून टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी खाकीतील माफियांचा व गुंडांचा ‘जंतर मंतर’वर वापर केला, परंतु तो बूमरंगप्रमाणे त्यांच्यावरच उलटला। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
मोदी सरकारविरोधात १५ ते २९ वयोगटातील हजारो मुले दिल्लीतील जंतर मंतर’ येथे (२० जुलै रोजी) जमा झाली होती. त्या मुलांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २६ जुलै रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेला तिरंगा मोर्चा शांततेत पार पडला. त्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती व त्यांचे सहकारी मनोज कुमार शर्मा (सहपोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था), अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आदी अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली दिसून आली.
२६ जुलैच्या रविवारी शिवाजी पार्कवर अफाट जनसागर लोटला होता. विद्यार्थी शक्तीचा विजय साजरा करण्यासाठी जेन झीं’ व त्यांचे पालक तसेच शिवसैनिक हजारोंच्या संख्येने जमले होते. शिवाजी पार्कचे रस्ते तुडुंब भरले होते, परंतु कुठेही फट झाले नाही अथवा गालबोट लागले नाही. मुंबई पोलीस प्रचंड संयमाने वागले. याबद्दल राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे जाहीर कौतुक केले. त्यांचे आभार मानले. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही मुंबई पोलिसांची कामगिरी अभूतपूर्व होती. २० जुलै रोजी दिल्ली पोलीस मात्र हिंस्र जनावरांसारखे वागले. आंदोलकांचे त्यांनी लचकेच तोडले. याची इतिहासात नोंद होईल एवढे नक्की.
यापूर्वी विद्यार्थी संघटनांनी कित्येक आंदोलने छेडली, परंतु कॉक्रोच जनता पार्टनि आयोजित केलेले आंदोलन कुणी विसरणार नाही. या आंदोलनात नव्या पिढीची भाषा बदललेली दिसली. आंदोलन हे लोकशाहीचे शत्र आहे. पण त्या शस्त्राला सभ्यता, संयम आणि वैचारिक धार असली पाहिजे. पुढील आंदोलनाच्या वेळी कॉक्रोच पार्टी याची दखल घेईल असे वाटते.































































