विरार-भरूच मेमू घसरली; अहमदाबाद रेल्वे वाहतूक ठप्प, पाच तासांनंतर सेवा सुरळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरारहून भरूचच्या दिशेने जाणाऱ्या मेमूची चार चाके रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना भिलाड रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरपावसात लटकलेल्या प्रवाशांची चांगलीच गोची झाली. या बिघाडामुळे एक्स्प्रेसच्या रांगा लागल्या होत्या. पाच तासांनी बिघाड दूर होताच रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आली.

विरार-भरूच मेमू प्रवाशांना घेऊन निघाली. ही मेमू भिलाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर येत असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास गाडीच्या इंजिन डब्याची ग चार चाके रुळावरून घसरली. ही घटना घडली त्यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी, नोकरदार आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी रेल्वेने प्रवास करत होते. अचानक इंजिन रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एक्स्प्रेसचा खोळंबा

रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि तांत्रिक दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम हाती घेतले. सकाळी सवाअकराच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. वलसाड येथून अपघाती मदत ट्रेन रवाना करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, गुजरात एक्स्प्रेस आणि वडोदरा इंटरसिटी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.