6.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरला जपान; दक्षिणेकडील कुमामोटो शहराजवळ केंद्र, पूल, रस्ते आणि इमारतींचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानच्या दक्षिणेकडील कुमामोटो प्रांत आज 6.8 रिश्टर एवढय़ा मोठय़ा भूकंपाने हादरला. भूकंपामुळे अनेक शहरांमधील इमारतींना हादरे बसले. काशिमा शहरातील एक शॉपिंग मॉल कोसळला. त्यात 50 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही प्राणहानीचे वृत्त नाही. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र, सुदैवाने त्सुनामी धडकली नाही. काही वेळाने इशारा मागे घेण्यात आला.

जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4.27 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली कुमामोटो शहराजवळ सुमारे 10 किलोमीटर आत होता. केंद्रबिंदू टोक्योपासून सुमारे 900 किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण जपानमधील अनेक ठिकाणी रस्ते, पूल तसेच इमारतांना तडे गेले. काही इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. भूकंपाचे हादरे बसताच बुलेट ट्रेनची सेवा तत्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. कुमामोटो शहराला जास्त फटका बसला. ऐतिहासिक कुमामोटो महालातील एका दगडी भिंतीचा काही भाग कोसळला. भूकंपानंतर सुमारे 60 सौम्य धक्के जाणवले. कुमामोटो शहरातील सुमारे 50 हजार घरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

दीड लाख लोकांना हलवण्याचे निर्देश

भूकंपानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून क्यूशू द्वीपवरील सुमारे 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.