खिशात नाही आणा, अन् मला बाजीराव म्हणा! भिकेचा कटोरा हाती घेतलेल्या मनपाकडून नगरसेवकांची राजेशाही बडदास्त, नगरसचिवांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्तोरस्ती पडलेले खड्डे, पंधरा दिवसांतून कधीतरी येणारे पाणी, फुटलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे पाणी… ही या महापालिकेची कर्तबगारी ! बोलबच्चन महापौर, मौनीबाबा आयुक्त हे या शहराचे प्राक्तन! ‘कायम रिकामी तिजोरी’ असा बहुमान मिरवणारी महापालिका आता नगरसेवकांची राजेशाही बडदास्त ठेवणार आहे. ३८ रुपयांचा कपभर चहा, ७० रुपयांचा नाश्ता आणि ५९० रुपयांचे जेवण देण्याचा प्रस्ताव खुद्द नगरसचिवांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

स्मार्ट सिटी, राज्याची पर्यटन राजधानी, आशिया खंडातील झपाट्याने विकसित होणारे शहर, एकाच दिवशी शंभर मर्सिडीज घेणारे शहर… अशी या छत्रपती संभाजीनगरची ख्याती ! यादव, मोगल, निजाम अशा ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा वारसा लाभलेल्या या शहराची महापालिका मात्र कायम दरिद्री! कधीही बघा, मनपाच्या तिजोरीत खडकूही नसतो. कर्ज काढून विकास करणे ही महापालिकेची खासियत. मागचे आयुक्त चमकोगिरी करण्यात सराईत होते, आता आलेले मौनीबाबा आहेत. महापौरांच्या बाबतीत तर विचारायलाच नको. मनपाची त्यांनी चावडीच बनवली आहे. चहा, पाणी, नाश्ता तसेच जेवण नगरसेवकांना देण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मागवण्यात आले आहे. हे दरपत्रक पाहून सर्वसामान्याला चक्करच येईल!

पंचतारांकित थाळीही एवढी महाग नसेल

शहरात ज्या हॉटेलांत रुचकर जेवण मिळते, तेथेही साधारण ३०० ते ४०० रुपयांपर्यंत थाळी मिळते. या थाळीत अनेक पदार्थ असतात. नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या थाळीत दोन भाज्या, डाळ, साधा भात, चपात्या, पुऱ्या, गोड पदार्थ, पापड, सलाद, लोणचे आणि पिण्याचे पाणी देण्यात येणार असून त्याची किंमत आहे ५९० रुपये!

किती बैठका होतात?

नगरसेवकांच्या पाहुणचाराकरिता वर्षभरासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किती बैठका होतात? किती नगरसेवक या बैठकांना येतात? या बैठकांमध्ये नक्की काय होते? हा सगळा संशोधनाचा विषय आहे.

नगरसेवकांच्या पाहुणचारासाठी रिकाम्या तिजोरीवर भार

मनपाच्या सर्वसाधारण, स्थायी समिती तसेच इतर सभांसाठी येणाऱ्या नगरसेवकांच्या शाही पाहुणचाराची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० जुलै रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेसमोर नगरसचिवांनी प्रस्ताव ठेवला आहे.

दीडपट जास्तीचे दर

शहरात कुठेही जा, दहा रुपयाला चहा मिळतो. फार तर पंधरा रुपये! पण नगरसेवकांना विलायची, जायफळ, सुंठ वगैरे घालून देण्यात येणाऱ्या चहाची किंमत तब्बल ३८ रुपये आहे! कॉफीही ३८ रुपयालाच. बिस्किटचा पुडा साधारण १० रुपयांना मिळतो. नगरसेवकांसाठी तो १८ रुपयांना मिळणार आहे. एक प्लेट तोही भरपेट नाश्ता बाहेर ५० रुपयांपर्यंत मिळतो. हाच नाश्ता नगरसेवकांना ७० रुपयांत देण्यात येणार आहे. २०० मिली पाण्याची बाटली कशी काय ७ रुपयांना मिळणार आहे? हे नगरसचिवच सांगू शकतील.