
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागात (आयडॉल) झालेल्या ‘एमएमएस’च्या परीक्षेत 60 पैकी तब्बल 52 विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आले आहे. ‘आयडॉल’कडून झालेल्या गोंधळामुळेच विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा फेरनिकाल लावावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
‘आयडॉल’च्या या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी प्रशासनावर अनेक आरोप केले आहेत. याबाबत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्याससाहित्य वेळेत पुरवण्यात आले नाही, संपूर्ण विभागासाठी फक्त एकच पूर्णवेळ शिक्षक आहे, पहिल्या सत्रात फक्त आठ तास तासिका घेण्यात आल्या, विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती वेळेत दिली जात नाही, अनेक निरोप शेवटच्या क्षणी दिले जातात आणि विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या ईमेलना उत्तरे दिली जात नाहीत, असे आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत.
उत्तरपत्रिका तपासणीत घोळ
अनेक विद्यार्थ्यांना अंतर्गत (इंटर्नल) परीक्षेत चांगले गुण मिळाले असताना लेखी परीक्षेत मात्र शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीतच घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याची दखल घेत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या वेळी निकाल पुन्हा तपासण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
‘विधी’साठी अवाढव्य शुल्क
मुंबई विद्यापीठाने आवश्यक अटींची पूर्तता न केल्यामुळे तीसहून अधिक विधी महाविद्यालयांच्या प्रवेशांवर निर्बंध घातले होते. मात्र, या महाविद्यालयांना आर्थिक दंड आकारून त्यांची प्रवेश क्षमता (पटसंख्या) कमी करण्यात आली आहे. यामुळे शेकडो इच्छुक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शिवाय, विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये ज्या संस्थांना अवाढव्य शुल्क आकारून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली जाते, त्यानुसार त्या संस्था नियमांची अंमलबजावणी करतात का? असा सवाल करत, विद्यापीठाने गरवारे इन्स्टिट्यूट अंतर्गत चालणाऱ्या संस्था आणि इतर विधी महाविद्यालये यांच्यात दुजाभाव करू नये, अशी मागणी युवासेनेने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.




























































