सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत अजिबात गांभीर्य नाही, संसदेत भाजपचे सदस्य मूळ विषयाला बगल देऊन नेहरू, इंदिरा गांधींवर टिवल्याबावल्या करत होते! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारला भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत अजिबात गांभीर्य नाही. काल लोकसभेमध्ये भाजपचे काही सदस्य हे मूळ विषयाला बगल देऊन पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि मागचे सरकार याच्यावर टिवल्याबावल्या करत होते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

आपण पेपरफुटीच्या विरोधात कडक कायदा आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले. एक टास्क फोर्सही स्थापन केला. त्याच्यावर संसदेत चर्चा सुरू आहे आणि बदनामी कुणाची करताय तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि काँग्रेसची. पण काल त्यांना प्रियंका गांधी यांनी उत्तम उत्तर दिले आणि देशाचे लक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाकडे लागलेले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पेपरफुटीची गळती सुरू आहे. एमपीएससी, औषध निरीक्षक आणि त्याच्याआधी टीईटीचे पेपर फुटले. त्यानंतर आजच पुण्यात बोगस डिग्रीचे स्कॅम समोर आले आहे. मार्कशिटचा घोटाळा समोर आला आहे. मी आजच एक ट्विट केले आहे. 2000 शाळा बंद पडलेल्या आहेत आणि नवीन शाळांच्या मंजुरीसाठी संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावर 5-10 लाख रुपये द्यावे लागत आहेत. मंजुरीचा कागद, इरादा पत्राचा कागद असे अनेक मुद्दे त्यात दिले आहेत. सगळ्यात मोठे शिक्षणाचे आदर्श केंद्र होते त्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने शिक्षणाची अव्यवस्था झालीय आणि देवेंद्र फडणवीस काय करत आहेत?

जंतरमंतरवर आंदोल झाले की शिव्या घाला, आम्ही काही टीका केली की आम्हाला वेडेवाकडे बोला. महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत पूर्ण रसातळाला गेला त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि केंद्रामध्ये मोदी शहा जबाबदार आहेत. विरोधकांचे कामच तुम्हाला आरसा दाखवायचे आहे. तुम्ही मुद्दायेच बोला, मेरीटवर बोला, मग आमच्यावर टीका करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात अराकता माजलीय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

शिक्षण विभागात ‘रेट कार्ड’चा धुमाकूळ, ओएसडींच्या मनमानी कारभारावर संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात शिक्षण खात्यामध्ये पेपरफुटीपासून ते बोगस डिग्री आणि शाळांच्या मंजुरीपर्यंत फक्त पैशांचा खेळ सुरू आहे. संस्थाचाकलांनी शाळा कशा चालवायच्या आणि मुलांनी कसे शिकावे? निधी अभावी शाळा बंद पडत आहेत आणि शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत. महाराष्ट्रात अशा तऱ्हेने संस्थाचालकांकडून 200 कोटी गोळा करण्यात आले आहेत. काही लोक मला दिल्लीत भेटायला आले होते, इतके ते हैराण आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.