
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वित्त व लेखाविभागातील एका अधिकाऱ्याने रिक्षाचालकाच्या मुलाला तीन लाखांत बनावट बी.कॉमची डिग्री दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने विभागाअंतर्गत चौकशी समिती स्थापन केली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित डिग्रीमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिक्षाचालक तक्रार घेऊन समोर आला आहे.
ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्यात आता एका रिक्षा चालकाच्या मुलाला बनावट डिग्री दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वित्त व लेखा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर यांच्या विरोधात संबंधित रिक्षा चालकाने तक्रार दिली आहे.
परीक्षा न देता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बीकॉमची डिग्री तीन लाखांत देण्यासंदर्भात मुखेडकर आणि रिक्षाचालकाचा संवाद झाला होता. दरम्यान, डिग्रीसाठी त्याने दीड लाख रुपये देण्याचे मंजूर केले होते. त्यातील काही रक्कम रिक्षाचालकाने मुखेडकर याला दिली होती. परंतु विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डिग्री मिळणे अपेक्षित होते. परंतु संबंधित विद्यार्थ्याला पुणे विद्यापीठाची बनावट डिग्री दिली जात असल्याचा संशय त्याला आला. त्यामुळे त्याने हा सर्व प्रकार समोर आणला.
विद्यापीठाकडे यासंदर्भात माहिती प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल पुढील दोन दिवसांत प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल.
डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ






























































