घाटकोपरमधील पालिकेच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर, शिक्षक नसल्याने दिवसाआड भरतायत वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचा फटका घाटकोपर पूर्व येथील राजावाडी परिसरातील महापालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये शिकणाऱ्या ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे या शाळेत एक दिवसाआड वर्ग भरत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

पूर्व-प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा भक्कम पाया असतो. त्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला हा गंभीर प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेने’चे राज्य सचिव सचिन भांगे यांनी केली आहे. मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना पालिकेकडे पाठपुरावा करणार

दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी ‘महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेने’चे राज्य सचिव सचिन भांगे आणि संघटक प्रकाश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन किशोरी पेडणेकर यांनी दिले.