
डिजिटल जन्मदाखला मिळवण्यासाठी आणि जन्मदाखल्यात दुरुस्ती करण्यासाठी लोकांना पालिकेच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केला आहे.
जन्मदाखल्यास विलंब होत असल्याबाबत अमीन पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सरकारचे लक्ष वेधले आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्रवेशासाठी दुरुस्त केलेला जन्मदाखला बंधनकारक आहे; पण नावाचे स्पेलिंग, वडिलांच्या नावासह पूर्ण नाव अशा लहान दुरुस्तीसाठीही पालकांना पालिका कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असल्याचा आरोप अमीन पटेल यांनी केला.





























































