भाविकांच्या श्रद्धेवर दरोडा, मोठ्या माशांना अभय; राम मंदिर देणगी घोटाळ्यावर तातडीने चर्चा घ्या, सुरजेवालांची राज्यसभा सचिवांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, अपहार आणि भाविकांनी दिलेल्या दानाची लूट झाल्याचे समोर आले आहे. एसआयटी चौकशीनंतर अनेकांना अटक झाली असली तरी मोठ्या माशांना अभय दिल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला. तसेच राज्यसभेचे कामकाज बाजूला ठेवून या महत्त्वाच्या विषयावर तातडीने चर्चा घडवून आणावी, यासाठी सुरजेवाला यांनी नियम 267 अंतर्गत राज्यसभेच्या सरचिटणीसांना औपचारिक नोटीस सादर केली आहे.

जगभरातील करोडो भाविकांनी श्रद्धेने आणि आस्थेने श्रीराम मंदिरासाठी हजारो कोटी रुपयांचे गुप्त व प्रत्यक्ष दान दिले आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थापन झालेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या काही सदस्यांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी या दानाचा अपहार करून भाविकांच्या श्रद्धेवर मोठा दरोडा टाकला आहे. हा केवळ भ्रष्टाचाराचा प्रकार नसून, लोकांच्या धार्मिक भावनांशी केलेला खेळ आहे, असे सुरजेवाला म्हणाले.

श्रद्धेच्या नावाखाली राम मंदिराच्या बांधकामात आणि देणग्यांमध्ये उघडपणे चोरी व लूट झाली आहे. संपत्तीच्या लालसेने मूलभूत मानवतेलाही मूठमाती दिली आहे. काही लहान माशांना पुढे करून या संपूर्ण घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा आणि मूळ मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवणाऱ्यांकडून सुरू आहे, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.

राम मंदिर ट्रस्टकडून जमिनीच्या खरेदीत कोट्यवधी रुपयांची हेराफेरी आणि गैरव्यवहार झाल्याचे अनेक पैलू आधीच समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची संसदेत प्राधान्याने आणि सविस्तर चर्चा होऊन सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आक्रमक मागणी सुरजेवाला यांनी केली आहे. या नोटीसनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

श्रीराम मंदिर देणगी चोरी – नवी एसआयटी स्थापन; सीएचा समावेश करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश