जंतर-मंतर आंदोलन, सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल; केंद्रीय गृह सचिवांविरुद्ध कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतर मैदानावर पुकारलेल्या आंदोलनादरम्यान सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. न्यायालयाने मेट्रो सेवा बंद न ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही मेट्रोच्या दोन स्थानकांची गेट बंद ठेवण्यात आली, याकडे लक्ष वेधणारी अवमान याचिका दाखल झाली आहे. न्यायालयीन निर्देशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांविरुद्ध अवमान कारवाई करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी अवमान याचिकेतून करण्यात आली आहे. याचिकेवर रविवारी विशेष खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

दिल्लीतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आल्याने तसेच रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर होणार आहे.

याचिकाकर्ते शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी शुक्रवारी रात्री सुमारे 9.30 वाजता जीटीबी नगर आणि विद्यापीठ मेट्रो स्थानकांना भेट दिली होती. यावेळी दोन्ही स्थानकांचे प्रवेशद्वार बंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या निर्बंधांमुळे प्रवाशांच्या ये-जा करण्यावर परिणाम झाल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.