शारजा बंदरात टँकरवर ड्रोन हल्ला; 22 हिंदुस्थानी खलाशी सुरक्षित, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिरातीजवळील शारजा बंदरात 9 ऑक्टोबर रोजी पनामाचा ध्वज असलेल्या कच्चे तेल वाहून नेणाऱ्या टँकरवर ड्रोन हल्ला झाला आहे. महत्त्वाची गोष्ट या जहाजावर 22 हिंदुस्थानी नाविक कार्यरत होते आणि ते सर्वजण या हल्ल्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत

हिंदुस्थानचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून या घटनेची अधिकृत माहिती दिली. हिंदुस्थान सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, खलाशांच्या सुरक्षेसाठी जहाज व्यवस्थापन कंपनीच्या सातत्याने संपर्कात आहे. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी शारजा अँकरेजजवळ घडली. या हल्ल्याचे लक्ष्य पनामा ध्वजांकित कच्चे तेल वाहून नेणारा टँकर एमटी जीईएम क्र. 2 होता. जहाजावरील सर्व २२ खलाशी सुरक्षित असल्याची खात्री झाली आहे.

आखाती प्रदेश आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये अलीकडे झालेल्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी ‘शिपिंग आणि खलाशांच्या सुरक्षेवरील मित्रगट’ (Group of Friends on Safety and Security of Shipping and Seafarers) सुरू करण्यात आला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. सागरी क्षेत्रात सहभागी असलेल्या देशांना एका व्यासपीठावर आणणे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून खलाशी आणि व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या गटाची पहिली बैठक न्यूयॉर्कमध्ये पार पडली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसालो न्यांती यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत 25 देशांनी सहभाग घेतला असून, हिंदुस्थान आणि लायबेरियाने आखाती प्रदेश आणि काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध करणारे संयुक्त निवेदन जारी केले. सागरी व्यापारावर परिणाम करणारे आणि निष्पाप लोकांचे बळी घेणारे हे हल्ले पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे दोन्ही देशांनी म्हटले आहे. हिंदुस्थान हा खलाशांचा एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि जहाजांवरील हे हल्ले तत्काळ थांबणे अत्यंत आवश्यक असल्याचे हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.