खाकीचा दणका! मुदखेडमध्ये नवीन पोलीस निरीक्षकांच्या पहिल्याच कारवाईत 4 कोटी 13 लाखांचा वाळूसाठा व वाहने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुदखेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून माहटी, खुजडा आणि टाकळी परिसरातील गोदावरी नदी पात्रातून दिवस-रात्र राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर प्रशासनाचा कडा बडगा उगारण्यात आला आहे.  मुदखेड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी धडक कारवाई करत अवैध वाळू माफियांना मोठा झटका दिला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक आयजी पथक आणि मुदखेड पोलिसांनी 9 ऑक्टोबरच्या रात्री संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत तब्बल 4 कोटी 13 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत जप्त केलेली वाहने 5 हायवा, 1 टीपर आणि 6 जेसीबी. एकूण मुद्देमाल किंमत: 4 कोटी 13 लाख 75 हजार रुपये मुदेमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण यांची बदली झाल्याची बातमी वाळू माफियांना कळताच, प्रशासनात काही काळ ढिलाई होईल या गैरसमजातून त्यांनी गोदावरी नदी पात्रात पुन्हा आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू चोरी केली जात होती. मात्र याची कुणकुण मिळताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तातडीने पावले उचलत आयजी पथकाच्या सहकार्याने माहटी येथील नदी पात्रावर धाड टाकली. या अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नवीन पोलीस निरीक्षकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.