कर्तव्यासाठी जीव अर्पण! छातीत तीव्र वेदना होत असतानाही बस चालकाने वाचवले 40 प्रवाशांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे चाळीस प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. अंगावर शहारे आणणारी घटना आंध्र प्रदेशात घडली. छातीत प्रचंड वेदना होत असताना आणि मरणाच्या दारात असताना 34 वर्षीय बस चालकाने काकीनाडा-विशाखापट्टणम मार्गावरील तुनीजवळ बस अत्यंत संयमाने रस्त्याच्या कडेला यशस्वीपणे वळवली आणि मोठा संभाव्य अपघात टळला. परंतु, बस थांबताच तो शूर चालक खाली कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. जेट्टी शिवा (34) असे या कर्तव्यनिष्ठ चालकाचे नाव असून ते आंध्र प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे (APSRTC) चालक होते.

गुरुवारी 8 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर चालकाच्या अफाट धाडसाबाबत आणि कर्तव्यावरील निष्ठेबाबत सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. एपीएसआरटीसीचे अध्यक्ष कोनकल्ला नारायण राव यांनी शुक्रवारी, 9 ऑक्टोबर रोजी चालकाच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शिवाला श्रद्धांजली वाहिली. अध्यक्षांनी शिवाच्या कृतीला त्याच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवेचे प्रतीक म्हटले असून, प्रवाशांच्या संरक्षणाप्रती असलेली त्याची वचनबद्धता इतर कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे ते म्हणाले.

शिवा यांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त करताना, राव यांनी या कठीण काळात महामंडळ त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. लागू नियमांनुसार मदत आणि सहकार्य देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एपीएसआरटीसीचे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची प्रशंसा करताना, त्यांच्या जबाबदारांसंबंधीची वचनबद्धता महामंडळ आणि सरकार दोघांसाठीही अभिमानाची बाब असल्याचा पुनरुच्चार राव यांनी केला. महामंडळाच्या वतीने शिवाच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.