
शनि अमावस्या शुक्रवारी रात्री सुरु झाल्याने शनिवारी पहाटेपासून अहिल्यानगरमधील राहुरीजवळील शनिशिंगणापूरमध्ये भाविकांचा ओघ सुरू झाला. मंदिरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर चारीही बाजूने वाहनतळ उभारल्याने भाविक पायी दर्शनासाठी दाखल झाले. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्यामुळे तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे आज शनिवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र, यंदा गर्दीवर सर्वपित्री अमावस्या व दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.
शनिवारी पहाटे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात शनि देवाच्या जयकाराने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला. दुपारी मध्यान आरती वेळी शनि मूर्तीला गंगेचे पाणी व पंचामृतने स्थान घालण्यात आले. मूर्तीला नीलवस्त्र कपाळी गंध सोन्याचा हार, असा साज चढवला गेला. मध्यान आरती झिम्बाब्वे येथील जयेश शहा राहुल हेगडे पुणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मूर्तीच्या चौथरा परिसरात मोठी गर्दीने आरती सोहळा संपन्न झाला. यावेळी शनि महाराजांच्या जय घोषाने आसमंत दणाणून गेले. शनी चौथरा बंद केल्याने भाविकांनी चौथरा खालूनच दर्शन घेतले.
संपूर्ण अमावस्या दिवसभर असल्याने मोठी यात्रा भरणार, असा अंदाज मंदिर प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर वाहनतळ उभारल्याने भक्तांना पायी प्रवास करावा लागला. सोनई मुळा कारखाना साईटवरील वाहनतळावर भाविकांची चारचाकी वाहने थांबवली गेल्याने भाविकांना ऑटो रिक्षामध्ये थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी रिक्षांना परवानगी दिली. मंदिराच्या महाद्वारसमोर पहिल्यांदाच भाविकांना नागमोडी दर्शन रांग उभारल्याने दर्शन पथ रांगेत भाविकांच्या गर्दीवर आळा बसला. दर्शनासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या.
यात्रा नियोजनासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सुदर्शन मुमका यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला. शुक्रवारी रात्री बारा वाजता मंदिर परिसराची त्यांनी स्वतः पाहणी करून संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. यात्रा असल्यामुळे अनेक दानशूर भक्तांकडून अन्नदान नाश्ता चहा पिण्याचे पाणी मोफत देण्यात आले.
पितृपक्षाचा परिणाम
पितृपंधरवडाचा अखेरचा दिवस शनिवारी शिवाय याच दिवशी शनी अमावस्याचा पर्वकाळ दुसऱ्या दिवशी घटस्थापना एकत्र आल्याने यात्रेच्या गर्दीवर परिणाम झाल्याचे जाणवले.
दुष्काळाचे सावट
संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच उभी पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून दुष्काळाची चटके सर्वत्र दिसत असल्याने भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरवल्याचे दिसले.
यात्रेतून कुंभमेळ्याची पूर्वतयारी
नाशिक येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार असल्याने या काळात तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होऊ शकते. या अनुषंगाने शनी मंदिर प्रशासक नाशिक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व शनी मंदिर कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी आज भरलेल्या यात्रेसाठी काटेकोर नियोजन केले. दर्शन रांग, वाहनतळ, देणगी, अभिषेक पावती, आरोग्य विभाग यांची स्वतंत्र मंदिराबाहेर व्यवस्था करण्यात आली. मंदिरातील संपूर्ण परिसर रिकामा ठेवण्यात आला. महाद्वार येथे नागमोडी दर्शन रांग उभारण्यात आली. कुंभमेळा पूर्वतयारी आजच्या गर्दीच्या अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये राबवण्यात आली.

























































