
तारापूर एमआयडीसीतील नांदोलिया ऑरगॅनिक प्रा. लि. कंपनीत मंगळवारी रात्री आर-२२ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात एक कामगार ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामकिशोर चौधरी असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे तारापूर एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नांदोलिया ऑरगॅनिक कंपनीत असलेल्या एसी यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या आर-२२ गॅसच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की सिलिंडरचे दोन तुकडे झाले आणि ते जवळ काम करणाऱ्या कामगारांवर आदळले. या दुर्घटनेत रामकिशोर चौधरी (४६) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी हरेराम यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान कंपनी प्रशासनाने दुर्घटनेची माहिती रात्री होऊनही पहाटे साडेतीन वाजेपर्यंत कळविण्यात आली नसल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच बोईसर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून सखोल चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.





























































