
जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी गुरुवारी आरोप केला की, बिहार पोलिसांनी सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून त्यांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेतले आहे. बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव होण्याची भीती भाजपला वाटत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
या मतदारसंघातून निवडणूक लढवत प्रशांत किशोर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना त्यांनी हा आरोप केला.
राजधानी पाटणा येथील जक्कनपूर पोलिस ठाण्याबाहेर पत्रकारांशी बोलताना किशोर म्हणाले, ‘मी गेल्या काही तासांपासून येथे थांबलो आहे. माझ्या १६ हून अधिक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांना नेमके कुठे ठेवले आहे, याची माहिती पोलिस देऊ शकत नाहीत.’
‘मी याला अटक म्हणत नाही, कारण माझ्या कोणत्या समर्थकावर कोणत्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे, याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. माझ्या समर्थकांना जक्कनपूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मी येथे आलो. मात्र, येथे आल्यानंतर मला सांगण्यात आले की, त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. येथील ठाणे प्रमुख तर जक्कनपूर पोलीस ठाण्याचा या ताब्यात घेण्याच्या कारवाईशी काहीही संबंध नसल्याचा दावा करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली’, असा आरोप या माजी निवडणूक रणनीतीकाराने केला.
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क होऊ शकला नाही.
जनसुराज पक्षाच्या संस्थापकांनी दावा केला की, ‘या ताब्यात घेण्यामागे सत्ताधारी भाजपच आहे.’
‘पोटनिवडणुकीत आपला पराभव होणार असल्याची भाजपला खात्री आहे. एखाद्या व्यक्तीला न्यायाधीशांसमोर हजर न करता पोलीस २४ तास ताब्यात ठेवू शकतात. त्यामुळे मतदान संपेपर्यंत माझ्या काही समर्थकांना ताब्यात ठेवण्याचा डाव आखण्यात आला आहे,’ असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, ‘प्रशासकीय यंत्रणेचा असा गैरवापर करूनही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) विजय मिळवून देता येणार नाही. प्रचारासाठी त्यांनी त्यांच्या जवळपास सर्व २०१ आमदारांना मैदानात उतरवले आहे.’
‘मतदार संघातील परिस्थिती आपल्या विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष नितीश कुमार यांचा बनावट व्हिडीओही तयार केला. त्या व्हिडीओमध्ये बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार हे भाजपच्या उमेदवारासाठी मत मागत असल्याचे दाखविण्यात आले’, असा आरोपही किशोर यांनी केला.
बांकीपूर मतदारसंघात एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत प्रशांत किशोर आणि भाजपचे युवा आघाडीचे नेते नीरज कुमार सिन्हा यांच्यात होत असल्याचे मानले जात आहे.
त्यांनी पुढे सांगितले, ‘पोलिसांच्या कामकाजातील व्यावसायिकतेचा पूर्णपणे अभाव अधोरेखित करण्यासाठी मी पोलीस ठाण्यात बसलो आहे. येथील ठाणे प्रमुखांनी आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या पक्षातील एका सहकाऱ्यावर कठोर मद्यबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही निश्चितपणे करणार आहोत.’





























































