
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा मैदानाबाहेरही धमाका पाहायला मिळाला. वैभवने आयसीसी पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे. हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध हिंदुस्थानच्या नुकत्याच झालेल्या 3-0 मालिका विजयादरम्यान सूर्यवंशीने 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आणि आपला पहिला मालिकावीर पुरस्कार पटकावला. त्याच्या प्रभावी कामगिरीचा परिणाम बुधवारी आयसीसीने अद्ययावत केलेल्या साप्ताहिक क्रमवारीत स्पष्टपणे दिसून आला.
वैभव 48 व्या स्थानावर पोहोचला
वैभवने आयसीसी टी-20 क्रमवारीत 230 स्थानांची झेप घेतली असून तो 48 व्या स्थानावर पोहोचला आहे. वैभवला आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. त्याचा संघसहकारी ईशान किशन या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
ईशानच्या खात्यात 919 गुण
झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर ईशानने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम रेटिंगही मिळवले. या डावखुऱया फलंदाजाने शानदार 81 धावा केल्या आणि 916 गुण मिळवले. ईशानने आतापर्यंत सलग तिसऱयांदा क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे.
शुभमन गिल पुन्हा एकदा अव्वल स्थानावर
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा जगातील अव्वल फलंदाजाचे स्थान मिळवले आहे. आपल्या कारकीर्दीत तिसऱ्यांदा शुभमन गिलने एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेल वेस्ट इंडिज मालिकेत खेळत नव्हता आणि याचा फायदा शुभमन गिलला झाला. त्याने या वर्षी जानेवारीपासून अव्वल स्थानी असलेल्या मिचेलला मागे टाकत पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाजाचा मान मिळवला आहे.
टी-20 क्रमवारीत हिंदुस्थानी खेळाडूंचे वर्चस्व
या क्रमवारीत हिंदुस्थानी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. वैभव आणि ईशान यांच्यासह अन्य खेळाडूंची दमदार झेप यावेळी पाहायला मिळाली आहे. भारतीय फलंदाज तिलक वर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी पुढे जात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर श्रेयस अय्यरने सात स्थानांची झेप घेत 24 वे स्थान मिळवले आहे. गोलंदाजांमध्ये लेग स्पिनर रवी बिश्नोई टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत 31 स्थानांनी पुढे जात 41 व्या स्थानावर पोहोचला आहे. दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱयाला मुकलेला वरुण चक्रवर्ती तीन स्थानांनी घसरूनही अव्वल 10 गोलंदाजांमध्ये कायम आहे.



























































