2 लाखांपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी, घाबरून जाऊ नका; ‘हेअरकट’मुळे यादीत कमी रक्कम; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम 2 लाखांपर्यंत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. ‘हेअरकट’मुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. संबंधित बँकांशी समन्वय साधून सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 हजार पात्र खात्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील प्रत्यक्ष थकीत रक्कम आणि कर्जमाफीच्या यादीतील रक्कम यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात माझे संपूर्ण कर्ज माफ झाले की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्याचा कोणताही परिणाम नसल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.

‘हेअरकट’ म्हणजे काय?

‘हेअरकट’ म्हणजे राज्य शासन आणि बँका यांच्यातील आर्थिक समझोता असून, कर्जमाफीमध्ये सरकार आणि बँकांनी किती रक्कम उचलायची याचे सूत्र आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांचे कर्ज कमी करणे असा नसून, सरकार आणि बँका यांच्यातील आर्थिक वाटा निश्चित करणे हा त्यामागील उद्देश आहे.

राज्य शासन व बँकांमधील समझोता

थकीत कर्ज     सरकारचा वाटा     बँकेचा हिस्सा
एक वर्षापर्यंत   85 टक्के           15 टक्के
दोन वर्षे         70 टक्के           30 टक्के
तीन वर्षे         55 टक्के           45 टक्के
चार वर्षे         45 टक्के           55 टक्के
4 वर्षांपेक्षा      35 टक्के           65 टक्के