
कोळसा खाण वाटप प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. हे प्रकरणच न्यायालयाने बंद केले आहे. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी हा निर्णय आला आहे.
यूपीए सरकारच्या काळात 2005 मध्ये ओडिशातील तालाबीरा-II खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी कोळसा खाते मनमोहन सिंग यांच्याकडे होते. सीबीआयने या आरोपांची चौकशी केली. मात्र त्यात कसलेही गुन्हेगारी कटकारस्थान आढळून आले नाही. त्यामुळे सीबीआयने 2015 साली या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तो फेटाळताना मनमोहन सिंग यांच्यासह अन्य आरोपींना समन्स बजावले. मनमोहन सिंग यांनी या समन्सला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने त्या समन्सला स्थगिती दिली होती. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची व न्या. व्ही मोहना यांच्या खंडपीठापुढे आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला.



























































