
सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता विनाअनुमती गैरहजर राहणाऱ्या तसेच मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
सैनिकी कल्याण विभाग आणि सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील अधिनस्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. अनुपस्थितीबाबत किंवा कार्यालयात उशिरा येण्याबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही. असे सरकारच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने आज परिपत्रक काढून शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय रजेवर जाऊ नये. रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे ही बाब ‘अनधिकृत गैरहजेरी’ मानली जाईल. अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजा वेतन देय असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे.




























































