
मुंबईत पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र उद्याने (पेट पार्क) विकसित करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी महापालिकेच्या आगामी सभेत ‘पेट पार्क’ विकसित करण्याबाबतचा ठराव मांडण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण पाहता नागरिकांकडे पाळीव प्राणी फिरवण्यासाठी कोणतेही उद्यान किंवा मैदान उपलब्ध नाही. विकास नियंत्रण नियमावलीनुसार पाळीव प्राण्यांच्या उद्यानासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. मुंबई शहरात पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त नवीन उद्यानांची निर्मिती असावी. या पर्यावरणपूरक संकल्पनेमुळे पाळीव प्राण्यांना आणि त्यांच्या मालकांना मोठा दिलासा मिळेल. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून अंमलबजावणीच्या दृष्टीने सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.




























































