
पावसाळी अधिवेशनातील आपल्या पहिल्याच भाषणाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसद अक्षरशः दणाणून सोडली. सरकारचा कारभार, देशातील शिक्षणव्यवस्था आणि जेन-झी आंदोलकांवरील अत्याचारावरून राहुल यांनी आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. ‘विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश देणाऱ्या देशाच्या तथाकथित गृहमंत्र्यांमध्ये सभागृहाला सामोरे जाण्याची हिंमत नाही. 30 गाड्यांच्या ताफ्यातून जातानाही शहा थरथर कापत होते,’ असा घणाघात राहुल यांनी केला. ‘अंधभक्त’ आणि ‘इडियट’ हे शब्द वापरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
पेपरफुटीविरोधी सुधारणा विधेयकावर ते लोकसभेत बोलत होते. राहुल यांनी यावेळी अमित शहांवर गंभीर आरोप केले. ‘पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याची परवानगी अमित शहांनीच दिली. पेलेट गनच्या मदतीने मुलांना लक्ष्य केले. शहांनीच हे गोळीबाराचे आदेश दिले,’ असा दावा राहुल यांनी केला. गृहमंत्री किंवा पंतप्रधानच असे आदेश देऊ शकतात, असे राहुल म्हणाले. ‘अमित शहा घाबरले आहेत. त्यामुळे ते सभागृहात येत नाहीत. आज त्यांचा 30 गाड्यांचा ताफा पाहिला. ते कावरेबावरे होऊन कारमध्ये बसले होते. थरथर कापत होते,’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल यांच्या घणाघाती भाषणामुळे सत्ताधारी पुरते बिथरले. त्यांच्या भाषणात सातत्याने अडथळे आणले जात होते. मूर्खांचे उदाहरण देताना कोणत्याही सदस्याचा उल्लेख केलेला नसतानाही त्यांच्या भाषणाला आक्षेप घेण्यात आला. अमित शहा यांचे नाव घेतल्यामुळेही हरकत घेण्यात आली. त्यांचा माईक बंद करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सात वेळा तर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 11 वेळा राहुल यांना बोलण्यापासून रोखले.
हे विधेयक पेपरफुटी रोखण्यासाठी नाहीच!
मोदी सरकारने आता आणलेले विधेयक पेपरफुटी रोखण्यासाठी नाही. हे विधेयक पेपर फुटल्यानंतर शिक्षा करण्यासाठी आहे. सरकार पेपरफुटी रोखणार आहे असे त्यात कुठेही म्हटलेले नाही. पेपरफुटी सुरूच राहणार आहे. केवळ शिक्षा एक वर्षावरून दहा वर्षांपर्यंत वाढवलेली आहे,’ असे राहुल गांधी पेपरफुटीविरोधी विधेयकाबाबत बोलताना म्हणाले.
लोकसभा अध्यक्षही पेचात पडले!
राहुल गांधी भाषण करताना सत्ताधारी सदस्य त्यांच्या भाषणात सातत्याने अडथळा आणत होते. त्यामुळे भाषण थांबवून ते आपल्या आसनावर बसले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांना भाषण सुरू करा असे सांगत होते. त्यावर राहुल म्हणाले, ‘मी जेव्हा बोलायला सुरुवात करतो, तेव्हा भाजपकडून कोणी ना कोणी बोलायला लागतो. मी संपवण्याआधीच सत्ताधारी सदस्यांना बोलायची संधी दिली जाते. या देशात फक्त भाजपनेच बोलावे अशी तुमची इच्छा असेल तर मी गप्प बसतो.’ राहुल यांच्या या भूमिकेमुळे ओम बिर्लाही काही काळ पेचात पडले.
माफी मागितली तरच तुम्हाला सभागृहात बोलायला देऊ असं मला सांगितलं गेलं. पण सत्य बोलण्यासाठी मी माफी मागणार नाही. आरएसएस-भाजपची तर कदापि नाही हे त्यांनी समजून घ्यावं.
गृहमंत्र्यांनाही जावेच लागेल!
अमित शहा आज लोकसभेत आले नाहीत, कारण ते दोषी आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला ते जबाबदार आहेत. ते दोषी नसते तर सभागृहात येऊन बसले असते, बोलले असते. मात्र ते आले नाहीत. त्यामुळेच त्यांना गृहमंत्रिपदावरून हाकलले पाहिजे ही आमची मागणी आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश शहांनी दिले असतील तर ते दोषी आहेत आणि गोळीबाराबद्दल त्यांना काही माहीतच नसेल तर ते अकार्यक्षम आहेत, असेही राहुल म्हणाले.
विद्यार्थ्यांचा खरा शत्रू आरएसएस
‘देशातील व्यवस्थेवर आरएसएसने कब्जा केला आहे. प्रधान यांचा राजीनामा हा दिखावा आहे. शिक्षण खाते ते चालवतच नव्हते. आरएसएस हे खाते चालवते, असे राहुल म्हणाले. विद्यार्थ्यांचा राग नेमका कशावर आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यांना विद्यार्थी म्हणून जगूच दिले जात नाही. आवडीनुसार शिकू दिले जात नाही. खुलेपणाने बोलू दिले जात नाही, प्रश्न विचारू दिले जात नाहीत. त्यांच्यावर आरएसएसला हवा असलेला इतिहास लादला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
देशातील प्रत्येक विद्यापीठात आरएसएसच्या पसंतीचा कुलगुरू आहे. धर्मेंद्र प्रधान हे केवळ प्रतीक आहे. विद्यार्थ्यांचा खरा शत्रू आरएसएस आहे. ते मुलांमधील विद्यार्थीवृत्तीच मारू पाहत आहेत. त्यांना फक्त अंधभक्त निर्माण करायचे आहेत, पण विद्यार्थ्यांना हे मान्य नाही. तुम्ही आमचे भवितव्य ठरवू शकत नाही, हा जेन-झी आंदोलनाचा संदेश आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या विचारधारेला मुलांनी आव्हान दिले आहे,’ असे राहुल म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, जगात तीन प्रकारचे लोक आहेत…
पहिले – विद्यार्थी
दुसरे – मूर्ख
तिसरे – मूर्खाला देव म्हणणारे अंधभक्त
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर हा शब्द कामकाजातून वगळण्यात आला.

























































