अमित शहांना पदावरुन हटवावं, पेलेट गनच्या वापराचा आदेश कोणाचा? SC द्वारे लाठीचार्जच्या आदेशाचा तपास व्हावा – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. यानंतर आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभेत आपल्याला बोलू दिले गेले नाही, असा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पेलेट गनच्या वापरावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांना आज नाही तर उद्या न्याय मिळेलच, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अमित शहा यांना पदावरून हटवण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील एका स्वतंत्र उच्चाधिकार समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्याच मुलांवर पेलेट गन वापरण्याची परवानगी कोणी आणि का दिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अँटी-पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत आपले म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, लोकसभेत मला बोलू दिले गेले नाही. विरोधी पक्षनेता म्हणून जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे हा माझा अधिकार आहे. परंतु मला माझे बोलणे पूर्ण करू दिले नाही, त्यामुळे मी येथे माझी भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ५ फोटो दाखवत त्यांनी संसदेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हिंदुस्थानच्या मुलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. सभागृहात विद्यार्थ्यांवर झालेल्या या क्रूरतेचा मुद्दा त्यांना उपस्थित करायचा होता, मात्र त्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे ज्यांनी विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवल्या, त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, त्यांनी २५ जुलै रोजी गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणाबाबत पत्र लिहिले होते. गृहमंत्र्यांना दिल्ली पोलिसांकडून सातत्याने ब्रीफिंग दिले जात होते आणि त्यांनी स्वतः अमित शहा यांना दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना पाहिले होते. यावरून राहुल गांधींनी सरकारला घेरले. जर गृहमंत्र्यांना या लाठीचार्जची आणि पेलेट गनच्या वापराची माहिती नव्हती, तर ही अत्यंत गंभीर बाब असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि जर त्यांना याची माहिती होती, तर मग संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.