IIT मुंबईतील विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने कथित आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये शोककळा पसरली असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी रात्री वसतिगृह क्रमांक 4 मधील जी-4147 या खोलीत 20 वर्षीय सोहिल राजकुमार संगवान याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सोहिल हा IIT बॉम्बेच्या मटेरियल सायन्स विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) 2023 च्या कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

 

प्राथमिक तपासात सोहिल हा मूळचा राजस्थानातील पिलानी येथील असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन आणि त्यातील चॅट्सची पाहणी केली. त्यातून तो काही काळापासून कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावाखाली होता. तसेच वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही काही अडचणींना सामोरे जात असल्याचे संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवळ मोबाईलमधील संदेशांवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. विद्यार्थ्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात असून त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या कारणांचा शोध घेतला जात आहे. शवविच्छेदन अहवाल, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.