
“माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. धुनीची पावडर पाण्यात टाकून प्यायल्यास आणि हे तावीज वापरल्यास तुमचे आजारी पती पूर्णपणे बरे होतील, तसेच घरातील पैसेही दुप्पट होतील,” असे अमिष दाखवून एका कुटुंबाची २५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन भोंदू महिलांचा चंद्रपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धेचा बाजार मांडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने हडपणाऱ्या या तिन्ही आरोपी महिलांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.
चंद्रपूर येथील जोड देऊळ पठाणपुरा वॉर्डातील रहिवासी तक्रारदार वैशाली अनिल खणके यांची जमीन इराई नदीच्या पुलासाठी संपादित झाली होती. त्या मोबदल्यात त्यांना ७१ लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. पती आजारी असल्याने वैशालीच घरातील सर्व आर्थिक व्यवहार पाहत होत्या. दरम्यान, शेजारीच भाड्याने राहण्यास आलेल्या विद्या निमजे हिची वैशाली यांच्याशी ओळख झाली. वैशाली यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत विद्याने त्यांच्या मनात भ्रमाचे जाळे विणण्यास सुरुवात केली.
“तुझ्या पतीला मी पूर्ण बरे करते,” असे सांगून विद्याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर हप्त्या-हप्त्याने ५ लाख २५ हजार रुपये चेकद्वारे काढून घेतले. भोंदू महिलेची भूक एवढ्यावरच थांबली नाही. ती वारंवार वैशाली यांच्या घरी जाऊन “धुनीची पावडर आणि ही चिठ्ठी पाण्यात टाकून प्या, प्रकृती छान होईल” असा भास निर्माण करायची. जुलैच्या पहिल्या आठवड्यात “घराचे कल्याण होईल” असे सांगून तिने वैशाली यांच्या कानातील सोन्याचे टॉप्स आणि गळ्यातील पोत काढून घेतली. त्यानंतर वैशाली यांना बँकेत नेऊन १० लाख रुपये रोख काढायला लावून ते स्वतःकडे घेतले. दुसऱ्याच दिवशी पुन्हा घरी येऊन, घर खरेदीसाठी ठेवलेले आणखी १० लाख रुपये घेऊन ती पसार झाली.
पोलिसांत तक्रार आणि कारवाई
हडप केलेल्या रकमेतील काही रक्कम विद्याने शाहिस्ता अंजुम आणि शबनम यांना दिली होती. मात्र, पतीच्या आरोग्यात कोणताही फरक पडत नसल्याचे पाहून वैशाली यांनी आपले पैसे परत मागितले. त्यावर “माझ्याकडे पैसे नाहीत, ते खर्च झाले आहेत” अशी उडवाउडवीची उत्तरे विद्याने दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैशाली यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस तपास सुरू
दरम्यान, तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिन्ही महिलांना तत्काळ अटक केली. आरोपींकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत.




























































