
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेमध्ये सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक 2026 वर वादळी चर्चा सुरू असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू असताना गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला. यामुळे लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
विद्यार्थ्यांचा रोष योग्यच होता. देशातील तरुणांचा सन्मान व्हायला हवा, त्यांना सन्मान हवा आहे. त्यांच्या आंदोलनात द्वेश किंवा राग नव्हता. उद्यो हेच तरुण आपले भविष्य घडवतील. अशा परिस्थितीत तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी चर्चा आवश्यक आहे, हे भाजप नेत्यांनी समजून घेतले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी हिंदुस्थानात विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त अशा तीन प्रकारच्या कॅटेगरी असल्याचा उल्लेख केला. यामुळे सभागृहात गदारोळ उडाला. संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांच्या विनंतीनंतर अध्यक्षांनी हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले, असे ते म्हणाले. pic.twitter.com/r00FASfyOO
— Saamana Online (@SaamanaOnline) July 29, 2026
राहुल गांधी पुढे म्हणाले की, परिस्थिती अशी निर्माण झाली की विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागले. जग कसे बदलत आहे हे तरुण समजून घेत आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देशाला अभिमान आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांनी अंधभक्त या शब्दाचा उल्लेख केला. त्यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला. राहुल गांधी यांनी जसा अंधभक्त या शब्दाचा उल्लेख केला, तसे सत्ताधारी बिथरले आणि त्यांनी आरडाओरडा करत राहुल गांधी यांचे भाषण थांबवले.
बराच काळ हा गदारोळ सुरू होता. अखेर लोकसभा अध्यक्षांनी पुन्हा राहुल गांधी यांना आपले भाषण सुरू करण्यास सांगितले. मी जसा बोलतो तसा सभागृहात गदारोळ सुरू होतो. मी बोलू लागलो की रिजिजू उभे राहतात, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच देशात फक्त भाजपच बोलेल का? असा सवालही त्यांनी केला.
परीक्षेची संपूर्ण व्यवस्थाच पोखरलेली आहे. शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसचा ताबा आहे. प्रत्येक मोठ्या पदावर आरएसएसचे लोक बसले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी कधी शिक्षण मंत्रालय चालवलेच नाही. धर्मेंद्र प्रधान हे आरएसएसचा मुखवटा होते. विद्यार्थ्यांनी धैर्याने आरएसएसचा सामना केला. प्रधान नव्हे, तर आरएसएस ही विद्यार्थ्यांची शत्रू आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना तुम्ही अंधभक्त व्हावे असे वाटते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
गृहमंत्र्यांमध्ये इथे बसण्याचे धैर्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेत गोंधळ सुरू झाला.चर्चेदरम्यान गृहमंत्री सभागृहात का उपस्थित नाहीत? गृहमंत्र्यांमध्ये सभागृहात येण्याची हिंमत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच गृहमंत्र्यांच्या आदेशावरूनच विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यांनीच विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.


























































