CWG 2026 – गुलवीर सिंगची सुवर्ण अक्षरात नोंद, 10,000 मीटर शर्यतीत पदक जिंकून इतिहास रचला; हरजिंदर कौरला रौप्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. हिंदुस्थानचा स्टार धावपटू गुलवीर सिंग याने पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. तर दुसरीकडे, भारोत्तोलनमध्ये हरजिंदर कौर हिनेही हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एका रौप्यपदकाची भर घातली आहे.

आशियाई विजेता असलेल्या गुलवीर सिंगने स्कॉटस्टौन स्टेडियमवर 27 मिनिटे 49.78 सेकंदांची वेळ नोंदवत ऐतिहासिक रौप्यपदकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या काय रोबिन्सनने या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत हिंदुस्थानला मिळालेले हे पहिलेच पदक आहे.

महिलांच्या 69 किलो वजनगटात 29 वर्षीय भारोत्तोलक हरजिंदर कौरने एकंदरीत 227 किलो वजन उचलत रौप्यपदकाला गवसणी घातली. ग्लासगोमधील वेटलिफ्टिंगमधील आठ स्पर्धांपैकी हिंदुस्थानचे हे सातवे पदक ठरले आहे. यापूर्वी 2022च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत हरजिंदरने कांस्यपदक जिंकले होते. गुलवीर आणि हरजिंदरच्या यशामुळे हिंदुस्थानच्या एकूण पदकांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. यामध्ये 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे.

बॉक्सिंगमध्ये चार पदके निश्चित!

दुसरीकडे हिंदुस्थानी मुष्टियोद्ध्यांनीही जोरदार मुसंडी मारली असून चार खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश करत कांस्यपदक निश्चित केले आहे. लव्हलिना बोरगोहाईन हिने महिलांच्या 75 किलो वजनगटात उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले. प्रीती पवार हिने महिलांच्या 54 किलो वजनगटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रिया चांगहास हिने महिलांच्या 60 किलो वजनगटाच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान स्कॉटलंडच्या निआम्ह मिचेलचा 4-1 असा पराभव करत पदक पक्के केले. जादुमणी सिंग मदेंगबाम याने पुरुषांच्या 55 किलो वजनगटाच्या उपांत्य फेरीत धडक मारत पदकावर शिक्कामोर्तब केले.