
पेपरफुटी आणि तत्कालिन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांवर संसदेवर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज केला होता. हा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही गाजत असून बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत उपस्थित केला. विद्यार्थ्यांना मारहाण करणारे मोकाट फिरताहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खरगे यांनी केली.
बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधकांनी लोकसभेमध्ये गोंधळ घातल्याने कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुसरीकडे राज्यसभेमध्येही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. लोकशाही सुरक्षित नाही, लोक सुरक्षित नाहीत, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या संसदेवरील मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी उत्तर दिल्यानंतर बुधवारी राज्यसभेत गदारोळ झाला. ही सामान्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती होती असे नड्डा म्हणाले. यावेळी खरगे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. खरगे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि दडपशाहीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्यानंतर राज्यसभेमध्ये गोंधळ उडाला.
VIDEO | Parliament Monsoon Session: “Democracy is not safe, people are not safe,” says Congress president and Rajya Sabha LoP Mallikarjun Kharge, attacking the government in the Upper House. Responding to his remarks, BJP MP JP Nadda says the police acted to maintain law and… pic.twitter.com/pyA2O46sPr
— Press Trust of India (@PTI_News) July 29, 2026
विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. याला सर्वत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बाक वाजवून पाठिंबा दिला. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे आणि दडपशाहीचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही विरोधकांनी केली.





























































