
चंद्रपूरच्या बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावर वन्यजीवांच्या दृष्टीने दुःखद आणि दिलासादायक अशा दोन घटना घडल्या. चांदा फोर्टकडे येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका अस्वलीचा जागीच मृत्यू झाला. तर याच मार्गावर रेल्वेरुळ ओलांडणारा वाघ दिसताच लोको पायलटने प्रसंगावधान राखत प्रथम हॉर्न वाजवला आणि त्यानंतर आपत्कालीन ब्रेक लावून रेल्वे थांबवली. त्यामुळे वाघ सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने निघून गेला आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील अष्टभुजा रमाबाई नगर परिसरातील कक्ष क्रमांक 407, चंद्रपूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रात घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिली. दरम्यान, या रेल्वेमार्गावर आतापर्यंत 14 अस्वलांसह सुमारे 130 वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा दावा हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी केला आहे. त्यामुळे या अतिसंवेदनशील वन्यजीव भ्रमणमार्गावर वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे





























































