मला माझ्या भवितव्याची पूर्ण कल्पना; एकतर हत्या होऊ शकते किंवा अटक केली जाऊ शकते, शेख हसीना मायदेशी जाण्यावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अटक, कारावास किंवा थेट फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार असतानाही बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना मायदेशी परतण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत मी बांगलादेशात परतणारच, असे शेख हसीना म्हणाल्या. एवढेच नाही तर मायदेशी परतल्यानंतर होणाऱ्या कोणत्याही गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेला ईमेलद्वारे दिलेल्या उत्तरात शेख हसीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझी हत्या केली जाऊ शकते, मला अटक होऊ शकते किंवा तुरुंगातही डांबले जाऊ शकते. मला माझ्या भवितव्याची पूर्ण कल्पना आहे. तरीही मला माझ्या मायदेशी परत जायचे आहे. कारण माझे लोक मला हाक मारत आहेत, असे त्या म्हणाल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त केले आहे.

बांगलादेशात मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; काय आहे कारण?

यावेळी शेख हसीना यांनी यापूर्वी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीचाही संदर्भ दिला. अवामी लीगचे कार्यकर्ते आणि नेते सध्या तीव्र दडपशाहीचा सामना करत आहेत. त्यामुळे मला काहीही झाले तरी मायदेशी परतायचे आहे. जर मला मृत्यूच यायचा असेल, तर तो माझ्या स्वतःच्या भूमीवर यावा अशी माझी इच्छा आहे. तिथे माझे आई-वडील चिरनिद्रा घेत आहेत आणि जिथे त्यांचे रक्त सांडले आहे, असेही त्या म्हणाल्या.