राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार यशपाल सुवर्णा यांच्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप आमदार यशपाल सुवर्णा यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उडुपी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक कोडवूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उडुपी टाऊन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

मंगळवारी उडुपी येथील सर्व्हिस बस स्थानकाजवळ झालेल्या निदर्शनादरम्यान सुवर्णा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अवमानकारक आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

NEET परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधातही सुवर्णा यांनी असभ्य भाषेचा वापर केला, तसेच भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेस समर्थकांविरोधात भडकावून सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.

गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणारी वक्तव्ये करणे याच्याशी संबंधित ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

भाजप आमदाराच्या विधानावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य (MLC) मंजुनाथ भंडारी म्हणाले की, राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भंडारी यांनी सांगितले की, ते राज्याचे गृहमंत्री प्रियंक खरगे यांची भेट घेऊन पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणार आहेत.